पुणे(प्रतिनिधी) – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून लॉकडाऊनही वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या जुलै मध्ये घेण्यात येणारी संगणक व मॅन्युअल टायपिंगची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
शासनमान्य संगणक टायपिंग व मॅन्युअल टायपिंगचे प्रशिक्षण देण्यात येत असते. जानेवारी ते जून या कालावधीतील प्रशिक्षण झालेल्या सत्राची परीक्षा जुलै मध्ये व जुलै ते डिसेंबर या कालवधीतील प्रशिक्षण सत्राची परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात येत असते. या परीक्षांसाठी प्रशिक्षण संस्थामार्फत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असते. एका वेळच्या परीक्षेसाठी सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची नोंदणी होत असते.
राज्यात मार्च महिन्यापासून बहुसंख्य जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. करोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनही सतत वाढविण्यात येऊ लागला आहे. मार्चपासून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा, विद्यालये, टंकलेखन, लघुलेखन व संगणक लेखन प्रशिक्षण संस्था बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जून अखेर अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होणे अशक्य वाटत असल्याने जानेवारी ते जून असे संगणक टायपिंग व मॅन्युअल टायपिंगच्या प्रशिक्षणाचे सत्र रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी एप्रिलमध्येच जाहीर केले होते.
संगणक टायपिंग व मॅन्युअल टायपिंग हा व्यावसायिक कोर्स आहे. त्यामुळे उमेदवारांना त्याचे प्रशिक्षण मिळाल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही हे उघड आहे. परीक्षा देण्यासाठी उमेदवारांची प्रशिक्षणासाठी 80 टक्के हजेरी असणे बंधनकारक असते. यंदा प्रशिक्षण सत्रच रद्द करण्यात आले आहे. करोनाची सद्यपरिस्थिती पाहता परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तुर्तास परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. आगामी कालावधीत परिस्थिती आटोक्यात आणल्यानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.