मुंबई :- पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्गिका 1, 2 आणि 3 ची उर्वरीत कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे रिंगरोडच्या कामाला गती दिली जाईल. तसेच पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, पुणे येथील कृषिभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, “सारथी’चे प्रशिक्षण केंद्रासह राज्यातील विविध विकासकामे वेगाने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला असून त्याची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
अजित पवार म्हणाले, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईतील जीएसटी भवनासह राज्यातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्यात येतील. दर आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढवा घेतला जाईल.
प्रकल्पांच्या मार्गातील अडथळे दूर केले जातील. ज्या विकासप्रकल्पांना केंद्र सरकारची मंजूरी, सहकार्य लागेल ते तात्काळ देण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. आवश्यकतेनुसार त्यांची भेट घेऊन राज्यातील प्रश्न मार्गी लावण्यात येतील. यापुढच्या काळात राज्यातील विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करणे हीच शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे.
पुणे मेट्रोची कामे तातडीने मार्गी लावा. पुणे रिंगरोडच्या कामात कुणी अडथळे आणत असेल तर त्याचा मुलाहिजा ठेवू नका. विकासकामात अडथळे ठरत असलेली अतिक्रमणे तात्काळ दूर करा. ज्या प्रकल्पांना केंद्राची परवानगी, मदत, सहकार्य अपेक्षित असेल त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने मुख्यमंत्री महोदयांना सादर करा. त्याची प्रत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.