टाकवे कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या मनोरंजनासाठी घेतले जातात विविध कार्यक्रम
कार्ला -करोनाचा प्रादुर्भाव मावळ तालुक्यात वाढत असल्याने विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरू असून, या कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची करोनाबद्दलची भीती दूर करण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवे यासाठी केंद्रांत विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. कार्ला (टाकवे) कोविड सेंटरमध्ये देखील विविध कार्यक्रम घेतले जात आहेत.
कार्ला-टाकवे कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या करोनाग्रस्त रुग्णांना मनोरंजनासाठी संगीत खूर्ची, चित्रकला’, पिलो पास, गीत गायन, निबंध अशाप्रकारच्या विविध स्पर्धा घेत विजयी स्पर्धकांना विविध बक्षिसे दिली जातात. तसेच कुठल्या रुग्णाचा वाढदिवस देखील उत्साहात सर्वजण साजरा करतात. तसेच उत्साह वाढवण्यासाठी प्रबोधनपर व्याख्याने, आरोग्य चांगले राहवे यासाठी दररोज सकाळी योग, प्राणायाम असे कार्यक्रम विविध योगगुरू व मनशक्ती केंद्रामार्फत दिले जात आहेत.
या सर्व उपक्रम येथे घेतले जात असल्याने रुग्णांच्या मनातील भीती दूर होऊन मनोबल वाढले जात असल्याची माहिती डॉ. गुणेश बागडे यांनी दिली. तसेच रुग्ण कधी बरे होतात हे त्यांनाही कळत नाही, तर मानसिकरित्या हे सर्व रुग्ण मजबूत झाले असल्याचे जाणवत असून, यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
सर्व उपक्रम उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूधन बर्गे, मावळ आरोग्य आधिकारी चंद्रकांत लोहारे, मावळ आरोग्य समन्वयक गुणेश बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद सोनवणे आर. आर. चव्हाण, सीमा शिंदे, सुहास सिंघम, प्रियांका खराडे, सर्जेराव गिरवले, आरोग्यसेविका लक्ष्मी धोत्रे, आरोग्यसेवक आशिष खोब्रागडे, जावेद, अक्षय व सर्व कोविड सेंटर कर्मचारी कार्यक्रम घेत आहेत.