उपमुख्यमंत्री पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची होणार नियुक्ती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर करोनाच्या महामारीमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली होती; मात्र आता त्यांची पदोन्नती झाली असून, त्यांच्या जागी नव्या आयुक्तांच्या नावाची चर्चा रंगली आहे. म्हाडाचे सीईओ योगेश म्हसे यांच्यासह बियाणे महामंडळाचे अध्यक्ष जी. श्रीकांत, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची नावे चर्चेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी श्रावण हर्डीकर हे गेल्या साडेतीन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कालावधी सहा महिन्यांपूर्वीच संपुष्टात आला होता. मात्र करोनाची परिस्थिती उद्भवल्यामुळे तसेच त्यांनी करोनाच्या कालावधी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली नव्हती. अजित पवार यांनी हर्डिकर यांच्यावर विश्वास दाखवित करोनाची स्थिती हाताळण्यासाठी सगळ्या पद्धतीने मदत करण्याचे धोरण राबविले होते.
मात्र आता करोनाची स्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. तसेच हर्डीकर यांच्या पदोन्नतीला आजच (दि. 30) शासनाने मंजुरी दिल्यामुळे सचिव दर्जाच्या पदावर कारभार स्विकारतील. पदोन्नतीच्या आदेशामध्ये सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणीच कार्यरत राहण्यास सुचविले असले तरी पुढील आठ दिवसांत त्यांची बदली होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्यामुळे त्यांच्याच मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती होईल, असे मानले जात आहे. सुरुवातीला पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांचे नाव आघाडीवर होते. मात्र हे नाव सध्या मागे पडले असून, म्हाडाचे सीईओ योगेश म्हसे यांच्या नावावर अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे. 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार हे म्हसे यांच्याच नियुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे म्हसे यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे.
असे असले तरी अजित पवारांच्या मर्जीतले आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांनीही स्पर्धेत उडी घेतली आहे. त्यांच्यामध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, बियाणे महामंडळाचे अध्यक्ष जी. श्रीकांत, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पांडे आणि पीएमआरडीएचे सुहास दिवसे यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. अजित पवार कोणाला पसंती देतात यावरच पुढील महापालिका आयुक्त निश्चित होणार, हे मात्र निश्चित आहे.
हर्डीकर बदलीसाठी प्रयत्नशील
गेल्या साडेतीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत असलेले श्रावण हर्डीकर हे स्वत:हूनच बदली करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांशी त्यांचे बिघडलेले संबंध याला कारणीभूत आहेत. पदोन्नतीसोबतच बदलीचा आदेश येईल, यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र बुधवारी (दि. 30) हर्डीकर यांच्या पदोन्नतीचा आदेश महापालिकेला प्राप्त झाला असून, पदोन्नतीनंतरही सध्याच्या ठिकाणीच कार्यरत राहण्याबाबत या आदेशामध्ये म्हटले आहे.