करोना बाधितांची संख्या वाढल्यास हॉस्पिटल पुन्हा कार्यान्वित करणार : विभागीय आयुक्त
4.5 कोटी रु. जम्बो कोविड सेंटरवर दरमहा होणारा सरासरी खर्च
पुणे – ‘करोना बाधितांवर उपचार करण्यासाठी शिवाजीनगर येथील “सीओईपी’ मैदानावर उभारलेले जम्बो कोविड हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्यात येत आहेत. सध्या शहरात करोनाच्या नव्या बाधितांची संख्या गतीने कमी होत आहे. तसेच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येही कोविड वॉर्डांतील बेड रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्यात येणार आहे. बाधितांची संख्या वाढली, तर सात दिवसांच्या आत पुन्हा जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यात येईल,’ अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी येथे दिली. त्यामुळे करोना ओसरत असल्याचे शुभसंकेत या निर्णयातून मिळत आहेत.
दि. 1 जानेवारी 2021 पासून जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याविषयी विभागीय आयुक्त म्हणाले, जम्बो हॉस्पिटलमध्ये सध्या करोनाचे 158 बाधित उपचार घेत आहेत. तर, पिंपरीतील मगर ग्राउंड रुग्णालयामध्ये करोनाचे 117 रुग्ण उपचार घेत आहेत.
ससून हॉस्पिटल, डॉ. नायडू हॉस्पिटल, बाणेर कोविड सेंटर, पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय आणि ऑटो क्लस्टर रुग्णालयांमध्ये बेड रिक्त आहेत. यामुळे जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 1 जानेवारीपासून जम्बो हॉस्पिटलमध्ये नवीन रुग्णांना प्रवेश मिळणार नाही. मात्र, सध्यस्थितीत तेथे असलेल्या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येतील.
जम्बो हॉस्पिटलमध्ये मशीन, इतर आरोग्य उपकरणे तशीच राहणार आहे. शासनाचा जो निधी आरोग्य कर्मचारी इतर बाबींवर खर्च होत आहे, तो कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध असताना तात्पुरत्या हॉस्पिटलवर खर्च का करायचा या हेतूने जम्बो हॉस्पिटल बंद करण्यात येत आहे. जम्बो हॉस्पिटलवर दर महिन्याला चार ते साडेचार कोटी रुपये खर्च होत असल्याचे राव यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात करोना साथीचा उद्रेक झाल्यानंतर बाधितांवर तातडीने उपचार व्हावेत आणि गरजेनुसार बेड्स उपलब्ध व्हावेत, यासाठी या कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
सुरुवातीच्या काळात येथील ठेकेदार व्यवस्थापनाने सेवा पुरवताना त्रुटी ठेवल्याने नव्या व्यवस्थापानाकडे या कोविड सेंटरची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर येथील व्यवस्थेत तातडीने सुधारणा झाल्या. सोबतच अन्य शासकीय रुग्णालयांवरील रुग्णसेवेचा ताण कमी होण्यास मदत झाली.
नव्या स्ट्रेन बाधितांसाठी डॉ. नायडू हॉस्पिटल
युरोपात आढळलेल्या करोनाच्या नवीन स्ट्रेनच्या बाधितांची संख्या शहरात वाढली, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार डॉ. नायडू हॉस्पिटल हे त्यासाठी निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राव यांनी दिली.