नवी दिल्ली – या आठवड्यात जागतिक कच्च्या तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तेल कंपन्यांनी आज स्वयंपाकाच्या गॅसच्या दराबरोबरच विमानाच्या इंधनाच्या दरात काही प्रमाणात कपात केली आहे. गॅसचा दर 36 रुपयांनी कमी करण्यात आला असून 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1,976 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे.
मे महिन्यापासून स्वयंपाकाच्या गॅसच्या दरामध्ये ही चौथी दर कपात आहे. या चार टप्प्यांमध्ये गॅसच्या किमती 377 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. मात्र घरगुती वापराच्या सिलेंडरच्या 14.2 किलोच्या किमतीत कसलाही बदल करण्यात आला नसून या गॅसच्या किमती 1,053 रुपये या पातळीवर स्थिर आहेत.
स्वयंपाकाचा गॅस आणि विमानाच्या इंधनाच्या किमतीत दर महिन्याच्या एक तारखेला आणि 16 तारखेला या कंपन्या फेरबदल करीत असतात. आज विमानाच्या इंधनाच्या दरात बारा टक्क्यांनी कपात करण्यात आली असून आता विमानाचे इंधन 121 रुपये प्रति लिटर झाले आहेत. 16 जुलै रोजी तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधनाच्या दरात 2.2 टक्क्यांनी कपात केली होती. विमान कंपन्यांनी इंधनाच्या दरात कपात करावी अशी जोरदार मागणी सरकारकडे केली होती. विमानाच्या तिकिटात इंधनाचा खर्चाचे प्रमाण 40% इतके असते.
दरम्यान, स्वयंपाकाचा गॅस आणि इंधनाच्या दरात जरी कपात करण्यात आली असली तरी या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कसलीही कपात केलेली नाही. कारण या कंपन्यांना सध्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो असे समजले जाते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज कमी जास्त करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून तेल कंपन्यांनी या दोन इंधनाच्या दरात कसलाही बदल केलेला नाही.