मुंबई – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने मवाळ पतधोरण जाहीर केल्यामुळे विविध बाजारात सुधारणा होऊ लागली आहे. सोमवारी रुपयाचा भाव 22 पैश्यानी वाढून 79.02 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला होता. अमेरिकेच्या पतधोरणानंतर जागतीक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर डॉलरचा दर इतर चलनाच्या तूलनेत कमी होत आहे. त्याचा फायदा भारतीय रुपयाला होत असल्याचे दिसून आले.
सहा मोठ्या चलनाच्या तुलनेत डॉलरचा दर आज 0.52% कमी होऊन 105.34 या पातळीवर गेला होता.
कच्च्या तेलाचे दर कमी होऊन 102 डॉलर प्रति पिंपापर्यंत गेला. या कारणामुळे रुपयाच्या मूल्यात सुधारणा होत असल्याचे पीएनबी परिवार या संस्थेचे विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले.
भारताचा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा निर्देशांक आठ महिन्याच्या उच्चारकावर गेला आहे. या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. या खरेदीमध्ये परदेशी गुंतवणूकदार सहभागी झाले असल्याचे वातावरण निर्माण झाल्यामुळे डॉलरची मागणी कमी होऊन रुपयाचा दर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये 1,046 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. या घडामोडीचा रुपयाला फायदा होत असल्याचे ते म्हणाले. शेअर बाजाराचे निर्देशांकही गेल्या आठवड्यापासून वाढत आहेत. मुळात भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. जागतिक परिस्थिती सकारात्मक झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला इतरांपेक्षा त्याचा जास्त लाभ होणार असल्याचे समजले जात आहे.