रशियात नवनवीन खासगी लष्करे लॉन्च केली जात आहेत. रशियातील गॅझप्रॉम ही महाकाय ऊर्जा कंपनी असून, तिने पोटोक नावाची प्रायव्हेट आर्मी लॉन्च केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धास सव्वावर्ष उलटून गेले असून, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या गाडीवर बॉम्बहल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कारच्या बाजूला मोठा स्फोट झाला आणि परिसरात धुराचे लोट पसरले. त्यावेळी घाईघाईत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पुतीन यांना दूर नेले. त्यांना कोणतीही इजा झाली नव्हती. त्यानंतर गेल्या आठवड्यात युक्रेनने ड्रोनच्या साहाय्याने रशियावर दहशतवादी हल्ला केला आणि पुतीन यांना ठार मारण्याचे त्यांचे लक्ष्य होते, असा आरोप रशियाने केला. मात्र लष्करी आणि सुरक्षा दलांनी ड्रोन निष्क्रिय केल्यामुळे हानी टळली, असे स्पष्टीकरणही रशियाने दिले. परंतु या आरोपांच्या आड दडून रशिया युक्रेनच्या शहरांवर, नागरिकांवर आणि पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन करू पाहत आहे, अशी टीका युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी केली आहे.
मॉस्कोच्या न्यायालयाने तीन आठवड्यांपूर्वीच क्रेमलिनच्या, म्हणजे रशियन सरकारच्या एका मोठ्या विरोधकाला देशद्रोह आणि रशियन सैन्याची बदनामी केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि त्याला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ब्लादिमीर कारा-मुर्झा हे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक आणि चित्रपट निर्मातेदेखील आहेत. वर्षभरापूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगवासातच होते. कारा-मुर्झा यांनी आपल्यावरील आरोप राजकीय असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत. आपल्यावर होत असलेल्या कारवाईची तुलना हुकूमशाह जोसेफ स्टॅलिनच्या राजवटीत झालेल्या अत्याचारांशी केली आहे. रिझोना हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला होता. मग त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले.
रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनमध्ये सैन्य घुसवले आणि लगेचच रशियन सैन्याविषयी “खोटी माहिती’ पसरवणाऱ्याला गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू केला होता. या कायद्याअंतर्गतच कारा-मुर्झा यांना गुन्हेगार ठरवून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुतीन अत्यंत पाताळयंत्री असून, त्यांना विरोध सहन होत नाही. मागच्या महिन्यात ग्रॅंड क्रेमलिन पॅलेसमध्ये 17 नवनियुक्त परदेशी राजदूतांना राजनैतिक प्रमाणपत्र देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान पुतीन यांनी एक भाषण केले. या भाषणा दरम्यान कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत.
संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता होती,तर पुतीन मात्र भाषण संपल्यानंतर तसेच उभे राहिले होते. एकही माणूस टाळ्या वाजवत नाही, हे पाहून ते वैतागून निघून गेले. या भाषणात पुतीन यांनी अमेरिका आणि युरोपीय संघाच्या राजदूतांवर जबरदस्त टीका केली. त्यांच्यामुळेच अमेरिका व युरोपचे मॉस्कोशी संबंध बिघडले, असे त्यांनी मत व्यक्त केल्यावर सर्व अधिकारी निर्विकार चेहऱ्याने शांत बसून राहिले होते. आज संपूर्ण जग काही देश वगळता, पुतीन यांच्या विरोधात गेले आहे आणि त्यास ते स्वतःच जबाबदार आहेत.
गेल्या वर्षी पुतीन यांना कर्करोग झाला असल्याची बातमी होती. गेल्याच महिन्यात तीव्र डोकेदुखीसह पुतीन यांची जीभही बधिर झाली आहे. त्यांच्या दृष्टीवरही परिणाम असून, हातपाय चेतनाहीन होत आहेत, अशा बातम्या आहेत. तरीदेखील पुतीन यांचा घमेंड कमी झालेला नाही. नुकतेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुतीन यांना अटक करण्यासाठी वॉरंट जारी केले आहे. युक्रेनमधून बेकायदेशीररीत्या हजारो मुलांना देशाबाहेर काढण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच युद्धामध्ये घडलेल्या अपकृत्यांसाठी पुतीन वैयक्तिकरित्या दोषी असल्याचा निर्वाळा त्या न्यायालयाने दिला आहे.
परंतु पुतीन यांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे अप्रत्यक्षरीत्या युद्धाची घोषणाच असेल, अशी थेट धमकी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतीन यांच्या सुरक्षा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दिली आहे. मात्र रशिया अशा कितीही वल्गना करत असला, तरी रशियन लष्करातच तेढ निर्माण झाली आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन लष्कराने विशेष लष्करी मोहीम सुरू केली. रमजान कॅड्रोव्ह हे चेचेन प्रजासत्ताकचे रशियन फौजांचे नेतृत्व करतात. तर येवगेनी प्रिगोझिन हे व्हॅगनार समूह या रशियातील खासगी लष्करी कंपनीचे प्रमुख आहेत. हे दोघेही पुतीन यांचे निष्ठावंत असून, ते त्यांना थेटपणे भेटून सर्व मोहिमांची माहिती देत असतात. रशियातील सरकारी लष्करास हे रुचलेले नाही. युक्रेनमधील युद्धामध्येही ही दोन खासगी लष्करी दले आणि सरकारी फौजा सक्रिय असून, एकमेकांवर कुरघोडीचा प्रकार सुरू आहे. सरकारी फौजांकडे पुरेशी साधनसामग्री नाही आणि त्यांच्यात अनेक वैगुण्ये आहेत, हे सांगण्यावर कॅड्रोव्ह आणि प्रिगोझिन यांचा भर आहे.
यातील आणखी एक गुंतागुंत म्हणजे, नवनवीन खासगी लष्करे रशियात लॉन्च केली जात आहेत. रशियातील गॅझप्रॉम ही महाकाय ऊर्जा कंपनी असून, तिने पोटोक नावाची प्रायव्हेट आर्मी लॉन्च केली आहे. युक्रेन युद्धाच्या पहिल्याच टप्प्यात आता रशिया युक्रेनची राजधानी कीव्ह जिंकणार, असे बोलले जात होते. परंतु हे प्रयत्न फसले आणि मग कॅड्रोव्हनी त्याबद्दल समाज माध्यमातून जाहीरपणे टीका करण्यास सुरुवात केली. युक्रेनमधील युद्ध हा चेचेन जवानांचा जिहाद असल्याची गर्जना त्यांनी केली होती. परंतु फटका बसल्यावर त्यांनी रशियन सरकारची, सरकारच्या लष्कराचे कमांडर लपिन यांच्यावर तोफ डागली आणि मग लपिन यांची उचलबांगडीही करण्यात आली.
प्रिगोझिन हे उद्योगपती असून, त्यांना यापूर्वी शिक्षाही झालेली आहे. रशियाने 2014 मध्ये क्रिमियाचा ताबा घेतला त्यावेळी रशियन लष्करास प्रिगोझिन यांच्या सैनिकांनी मदत केली होती. गेल्या सप्टेंबरमध्ये प्रिगोझिन यांनी युक्रेनमध्ये रशियातील कैद्यांनादेखील मी माझ्या फौजांमध्ये सामील करून घेत आहे, असे जाहीर केले. बाकुमत येथे रशियनांना जो विजय प्राप्त होत आहे तो आपल्यामुळेच, असा दावाही त्यांनी केला. वास्तविक रशियाच्या घटनेप्रमाणे परराष्ट्र धोरण व संरक्षण हे फक्त सरकारच्या कक्षेत येते. परंतु रशियात मात्र पुतीन यांच्या कारकिर्दीत कायदा गुंडाळून ठेवण्यात येत आहे आणि खासगी लष्कर सरकारी लष्करावर तोंडसुखही घेत आहे. यामुळे जो गोंधळ उडत आहे, त्याचा आज ना उद्या पुतीन यांना फटकाच बसणार आहे.
हेमंत देसाई