पुणे -नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या सर्व्हर मधील तांत्रिक अडचणी पुन्हा निर्माण झाल्या असून, अद्याप त्या दूर झाल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन भाडेकरारांची (लिव्ह ऍण्ड लायसन्स) नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. भाडेकरार दस्तांची नोंदणी न झाल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्यभरात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार भाडेकराराच्या दस्तांची नोंदणी होते. मागील महिन्यात नोंदणी विभागाच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांची नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे संपूर्ण राज्यात सुमारे 25 हजारांहून अधिक दस्तनोंदणीसाठी प्रलंबित होते. मध्यंतरी तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे काही प्रमाणात प्रलंबित दस्तांची नोंदणी टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली. परंतु पुन्हा सर्व्हरमध्ये अडचणी येऊ लागल्याने हे काम थांबले आहे. त्याचा फटका नागरीकांना सहन करावा लागत आहे.
याविषयी माहिती देताना नोंदणी विभागाकडून सांगण्यात आले की, नोंदणी विभागाच्या सर्व्हर तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे भाडेकराराचे दस्त प्रलंबित राहत आहेत. राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ही अडचण दूर करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पुन्हा सेवा पुर्ववत होईल, अशा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यासाठी भाडेकरार महत्त्वाचा
राज्यातील ग्रामीण भागातून आणि परराज्यांमधून महानगरांमध्ये नोकरी, शिक्षणानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना रहिवास पुरावा, दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी, गॅस नोंदणी, पारपत्र, विवाह नोंदणी अशा विविध कारणांसाठी ऑनलाइन भाडेकरार ग्राह्य धरण्यात येतो. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करायचा असल्यास भाडेकरार नोंदणीकृत असणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. नागरीकांची वाढती गरज लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील ऑनलाइन भाडेकराराला आता राज्य सरकरानेही कायदेशीर म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे ऑनलाइन भाडेकरार करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.