रेडा- इंदापूर तालुक्यातील गोखळी येथे गोफणे कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यानंतर बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक किलोमीटर झाडाझुडपातून पायवाट काढत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या कुटुंबांची विचारपूस केली.
(दि. 25) विजयादशमीदिवशी भरणे हे विविध कार्यक्रमात व्यस्त होते. इंदापूरचे लोकप्रतिनिधी मात्र, कोणत्याही ठिकाणी गोरगरिबांच्या घरात सुख दुःखाचे प्रसंग आल्यास भरणे हे मंत्रालयातील महत्वाच्या बैठकीचा विचार न करता त्या कुटुंबायांना आधार देण्यास प्रथम प्राधान्य देत आहेत. याचीच प्रचिती गोखळी येथील गोफणेवस्ती येथील रहिवासी नितिन गोफणे यांच्या कुटुंबीयाच्याबाबतीत आली. गोफणे यांच्या कुटुंबातील नितीन गोफणे यांचे सख्खे भाऊ रामचंद्र गोफणे यांचे मागील आठवड्यात कर्नाटकात अपघाती निधन झाले होते. याची माहिती भरणे यांना समजताच त्यांनी व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी पोलीस प्रशासन आणि सोबत स्वीय सहायकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.