पुणतांब्यात आ. कोल्हेंच्या हस्ते शिधापत्रिकांचे वाटप

शासकीय योजना तळागाळात पोचविण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

कोपरगाव – शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत समाधान शिबिरान्वये पुणतांबा परिसरातील 200 लाभार्थ्यांना आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. युती शासनाचे उपक्रम तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशिल राहावे, असे यावेळी आ. कोल्हे म्हणाल्या.
सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी गावातील रस्त्यांच्या अडचणी मांडल्या. याप्रसंगी सुहास वहाडणे यांनी आमदार निधीतून पुणतांबाअंतर्गत तीन रस्त्यांवर मुरूम टाकून दळणवळणाच्या दृष्टीने त्याचे काम करावे, अशी मागणी केली.

याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, माजी सरपंच सुधाकर जाधव, रामभाऊ बोरबणे, सर्जेराव जाधव, संभाजी गमे, प्रतापराव वहाडणे, दीपक वहाडणे, महेश चव्हाण, अनिल मोरे, योगेश घाटकर यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रतापराव वहाडणे यांनी आशा केंद्र चौफुली येथे जादा गतिरोधक टाकल्याने अपघातांत वाढ झाली असून, तो तातडीने काढून टाकावा, अशी मागणी केली. शिर्डी उपविभागीय कार्यालयाचे शुक्‍लेश्वर इजगे, योगेश पालवे, कुलथे यांनी शासनांच्या योजनांबाबत माहिती दिली.

आ. कोल्हे म्हणाल्या, पुणतांबा परिसरातील नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी आजवर सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. समाधान शिबिराअंतर्गत वाकडी परिसरातील 500 शिधापत्रिकांचे वाटप केले आहे. येथील पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेताना तीन वर्षे पाठपुरावा करावा लागला. महिलांना रोजच पाण्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांचे दु:ख आपण जाणून आहोत. सध्या दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. सर्वांच्या साथीने पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.