नगर – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अन् भाजपचे आ. राम शिंदे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे. वेळेपूर्वी गळीत हंगाम सुरू केल्याच्या आ. शिंदे यांच्या तक्रारीची सरकारने दखल घेऊन चौकशी केली. या चौकशीनंतर आ. रोहित पवार यांच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील बारामती ऍग्रो कारखान्याच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत प्रादेशिक उपसंचालक (साखर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आ. राम शिंदे यांनी याबाबत विधान परिषदेमध्ये लक्षवेधी क्रमांक 7च्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता. उसाचा हंगाम सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत गाळप हंगाम धोरण निश्चित करण्यात बाबत चर्चा झाली. या बैठकीत दहा मंत्री होते. यात उसाचा पहिला गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निश्चित झाले होते. तरी देखील बारामती ऍग्रो कारखान्याने निश्चित केलेल्या वेळेच्या अगोदर गाळप सुरू केले होते.
या प्रकरणी आ. शिंदे यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली. प्रथम चौकशी अधिकारी अजय देशमुख यांना चौकशी केली होती. मात्र देशमुख यांच्यावर चौकशीचा चुकीचा अहवाल दिल्याचा ठपका ठेवून दि. 26 डिसेंबरला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा चौकशी करण्यात आली. या चौकशीत बारामती ऍग्रो कारखान्याने नियमाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संजय गोंदे (साखर) विभाग यांनी भिगवण पोलीस ठाण्यातबारामती ऍग्रो चे कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.