कोपरगाव (प्रतिनिधी) –आमदार आशुतोष काळे यांची माहेगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने श्री दत्त देवस्थान नुकतीच पेढेतुला करण्यात आली. याप्रसंगी काशिनाथ महाराज हाके, माजी आमदार अशोकराव काळे, स्नेहलताई शिंदे, जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका चैतालीताई काळे, संभाजीराव काळे, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे, सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र काळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राधाकिसन काळे, के. पी. रोकडे, उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, पोलीस पाटील विक्रांत काळे आदी उपस्थित होते.
आ. काळे यांचा विधानसभा निवडणूक प्रचार प्रारंभ त्यांच्या गावी माहेगाव देशमुख येथे श्री दत्त देवस्थान येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला होता. त्यावेळी काळे निवडून आल्यानंतर पेढेतुला करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. काळे आमदार झाल्यानंतर त्यांची पेढेतुला करण्यात आली.
यावेळी आ. काळे म्हणाले, निवडून आल्यानंतर विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करावे लागेल, अशी परिस्थिती होती. मात्र माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना केलेली विकासकामे डोळ्यांसमोर असल्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार असूनही विकास करून दाखवणारच, अशी मनात खूणगाठ बांधलेली होती. परंतु आता सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करायला संधी मिळाली आहे. विजयात माहेगाव देशमुख ग्रामस्थांचा देखील मोठा वाटा आहे. त्यामुळेच पहिल्याच अधिवेशनात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मांडला. मतदारसंघातील अनेक रस्ते नकाशावर नाहीत. हे रस्ते नकाशावर आणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमदार निधी व्यतिरिक्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व माहेगाव देशमुख, कुंभारी, कोळपेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.