पुणे -विद्यापीठ अनुदान आयोगाने शनिवारी महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया ही 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे नियमित सत्र 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश “यूजीसी’ने सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांना दिले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक कोलमडले. गतवर्षीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षाही अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होईल, याची काहीच स्पष्टता नाही. त्या पार्श्वभूमीवर “यूजीसी’ने करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार कार्यवाही करताना यापूर्वी “यूजीसी’ने करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2020 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनावर शैक्षणिक सत्राचे नियोज करावे, असेही “यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.
बारावीचा निकाल 31 जुलै रोजी लागणार आहे. या निकालानंतर महाविद्यालये आपली प्रवेशप्रक्रिया सुरु करू शकतील. त्यानंतरही काही कारणामुळे बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लांबला तर महाविद्यालये 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत आपले शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे नियोजन करू शकतील.
महाविद्यालयाच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्याचप्रमाणे करोनाच्या संसर्गामुळे काही विद्यार्थी प्रवेश रद्द करू शकत असतील, तर त्याचे कोणतेही शुल्क घेता कामा नये, असेही “यूजीसी’ने म्हटले आहे. महाविद्यालय सुरू होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पहात होते.
परीक्षा 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा
विद्यापीठ व महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 31 ऑगस्टपूर्वी घेणे आवश्यक आहे. ह्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत.