हॉंगकॉंग- हॉंगकॉंगमधील प्रशासनाकडून लोकशाहीवादी चार लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवले जाण्याच्या पार्श्वभुमीवर लोकशाहीवादी सर्व प्रतिनिधींनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. बुधवारी एका पत्रकार परिषदेमध्ये लोकशाहीवादी गटाने या निर्णयाची घोषणा केली.
चीनच्या नॅशनल कॉंग्रेस स्टॅन्डिंग कमिटीच्या मंगळवारी आणि आज (बुधवारी) झालेल्या बैठकीमध्ये या आमदारांना अपात्र ठरवण्याचा ठराव करण्यात आला. हॉंगकॉंगच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देणारे, चीनच्या सार्वभौमत्वाला न जुमानणारे तसेच राष्ट्रीय असुरक्षिततेला धोका निर्माण करणारे आणि हॉंगकॉंगच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी परदेशी शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना अपात्र ठरवण्यात यावे, असा ठराव कमिटीच्या बैठकीत करण्यात आला होता.
त्यानुसार अल्वीन येउंग, डेनिस क्वोक, क्वोक का की आणि केनिथ लेउंग या चार आमदारांना प्रशासनाने अपात्र ठरवण्यात आल्यानंतर सर्व आमदारांनी लगेचच सामूहिक राजीनाम्याची घोषणा केली.
आगामी काळात लोकशाहीच्या मागणीसाठी आम्हाला खूप मोठा लढा लढावा लागणार आहे. मात्र आम्ही आमचा लढा सोडणार नाही. लोकशाहीवादी आमदार आपले राजीनामे गुरुवारी सादर करतील, असे लोकशाहीवादी गटाचे समन्वयक वु ची-वाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अपात्र करण्यात आलेल्या चार आमदारांना या वर्षाच्या सुरुवातीला सप्टेंबरमधील कोणत्याही निवडणुकीत भाग घेण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र करोनाच्या साथीमुळे ही निवडणूकच पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे हे आमदार आपापल्या पदांवर कायम राहिले होते.