… तर चीनचा विनाश अटळ

अमेरिकन अधिकाऱ्याने दिला इशारा

युगूर नागरिकांचा शिनजिआंग प्रांतात नरसंहार 


हॉगकॉंगमधील लोकांचे अमेरिकेत स्वागत

वॉशिंग्टन – चीनने लादलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाल्यानंतर जर कोणाला हॉंगकॉंग सोडून जायचे असेल तर त्यांचे अमेरिकेत स्वागत आहे, अशी भूमिका अमेरिकन अधिकाऱ्याने मांडली. त्याचवेळी अमेरिकेला जर चीनने युध्दात ओढले तर फार मोठ्या विनाशाला चीनला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

साऊथ चायना मॉर्निंगपोस्ट या दैनिकात आलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रियन म्हणाले, युगूर नागरिकांचा नरसंहार करण्यासारखे काही तरी शिनजिआंगमध्ये घडत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला तोंड देताना तैवानने आपली संरक्षण व्यवस्था मजबूत करावी लागेल.
जर हॉंकॉंगमधून अधिकाधिक स्थलांतरीत आले तर ती आनंदाची गोष्ट आहे. कारण ती उत्तम माणसे आहेत. हॉंगकॉंगमधील नागरिक आणि हॉंगकॉंगला भेट देणाऱ्यांसाठी तेथे जे काही घडणार आहे ते फार वेदनादायी असेल. हॉंगकॉंगवर पूर्णत: चीनचा अंमल आहे, असे ओब्रियन म्हणाले.

या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, हॉंगकॉंगमध्ये ज्यांच्यावर खटले चालू आहेत त्यांचा अमेरिकन स्थलांतरीत कायद्यानुसार विशेष विचार करण्यात येईल. इंग्लंडनेही अशाच स्वरूपाचे धोरण आखले आहे.

चीन युगूर महिलांचे अक्षरश: मुंडन करत आहे. त्या केसांची गंगावने बनवत आहे आणि ती अमेरिकेत विकण्यासाठी पाठवत आहे. जर तेथे नरसंहार सुरू नसेल तर त्याच्या जवळपास जाणारे काही तरी सुरू आहे, असे ओब्रियन म्हणाले.

ओब्रियन यांच्या वक्तव्यापुर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, शिनजिआंग प्रांतात जे काही चालले आहे, ही चीनची अंतर्गत बाब आहे. तेथे मुस्लिमांवर होणारे कथित अन्याय वगैरे गोष्टी चीनला बदनाम करण्यासाठी काही चीन विरोधी शक्तींनी रचलेला कट आहे.

ओब्रियन म्हणाले, चीन हे अमेरिकेच्या या पिढीपुढचे खरे खुरे आव्हान आहे. अमेरिकन नागरिकांना त्याबाबत जागे केल्याबद्दल मी ट्रम्प प्रशासनाचे आभार मानतो. शि जिनपिंग यांनी लष्कराला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. तरी मला वाटते आम्ही त्यांचे शत्रू नाही आहोत. युध्द टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे अमेरिकेने मजबूत व्हायला हवे. जर आम्हाला युध्दात गुंतवले तर त्याची फार मोठी किंमत चीनला मोजावी लागेल. त्याचवेळी तैवानला आपली संरक्षणसिध्दता बळकट करावी लागेल. ट्रम्प प्रशासनाने ड्रोन, युध्दनौका भेदी आणि हवाई हल्यांना तोंड देणारी क्षेपणास्त्रे तैवानला विकण्याचे अनेकदा मान्य केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.