तळेगाव, (वार्ताहर) – संत निरंकारी मंडळ व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल – स्वच्छ मन” या उपक्रमांतर्गत गाव तळे परिसरात स्वच्छता करण्यात आली. स्वयंसेवकांनी दोन तासात तब्बल चार टन कचरा संकलित करून तो कचरा डेपोमध्ये पाठविल.
या उपक्रमानिमित्त मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे शहरातील गाव तळे लागत असणाऱया परिसराची स्वच्छता करून घेण्यात आली. या वेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता अभिषेक शिंदे, शहर समन्वयक गीतांजली होनमने, स्वच्छता सुपरवायझर व संत निरंकारी मंडळ यांचे असणारे एकूण ५० सदस्य उपस्थित होते.
या वेळी शहर समन्वयक गीतांजली होनमने यांनी स्वच्छतेचे व पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगितले. तसेच सर्वांनी सकाळी ८ ते १० या वेळेत दरम्यान गाव तळे परिसरात श्रमदान केले व सुमारे ४ टन कचरा संकलित केला. संकलित केलेला कचरा नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरमध्ये भरून कचरा डेपो येथे पाठविला.