जाधववाडी, (वार्ताहर) – ज्ञानाई शिक्षण संस्थेचे कै. जगन्नाथ तुकाराम राऊत प्राथमिक विद्यालय व ज्ञानज्योती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जाधववाडी येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.
कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला.
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध मराठी साहित्यिकांची माहिती, त्यांच्या कविता, त्यांचा जीवनपट विविध भित्तिपत्रकांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका वर्षा लोखंडे, प्रभारी मुख्याध्यापक अभिजित राऊत, कांचन राऊत व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.