भोर, (प्रतिनिधी) – भोरमधील दुर्गाडी परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्याचा बैल चरत असताना हल्ला करून फस्त केला आहे. भोरमधील दुर्गाडीसह आठ गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले असून दुर्गाडीच्या घटनेने त्यात शभर पडली आहे.
मानटवस्ती, दुर्गाडी (ता.भोर) येथील शेतकरी कोंडिबा लक्ष्मण गोरे यांचा खिलार जातीचा तीन वर्षे वयाचा बैल रविवारी (दि. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास मालकीच्या क्षेत्रात गट नंबर १७/३ मध्ये चारत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करुन त्याला फस्त केले आहे. साधारण ३० हजार किंमतीच्या बैल मारला गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
वनखात्याने पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. गेले तीन चार महिन्यांत सातत्याने अशा घटना घडत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डेहण,पांगारी, नानावळे, सांगवी, खुलशी, साळुंगण, कोंडगाव, या परिसरातील ४० पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मारली गेली असल्याने वन विभागाने या बिबट्याचा तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.