नवी दिल्ली – दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी येत्या 1 जानेवारीपासून दिल्लीत कोळसा वापरास पूर्ण बंदी करण्यात आली आहे. घरगुती स्वरूपातही कोळशाचा वापर करता येणार नाही.
वायु गुणवत्ता प्रबंधन आयोगाने हे आदेश जारी केले असून ते दिल्ली आणि एनसीआर भागालाही लागू असतील. तथापि थर्मल पॉवर प्लॅंटमध्ये सल्फरचे प्रमाण कमी असलेल्या कोळशाच्या वापराला अनुमती कायम ठेवण्यात आली आहे. या बंदी आदेशामुळे दिल्ली किंवा आसपासच्या भागात इंधन म्हणून कोळशाचा वापर करता येणार नाही. त्यामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येऊ शकणार आहे.
दिल्लीत हवा प्रदुषणाची पातळी अनेकदा धोक्याच्याही वर जाते. त्यामुळे हे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना सध्या केल्या जात आहेत. कोळसा वापर बंदी हा त्याचाच एक भाग मानला जात आहे.