गायिका सपना चौधरीने केली भाजपची गोची

नवी दिल्ली – गायिका सपना चौधरी हिने हरियाणा विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराचा प्रचार करत भाजपची गोची केली. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सपनाने चक्क प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार गोपाळ कांडा यांचा प्रचार केला.

हरियाणा लोकहित पक्षाचे उमेदवार असणारे कांडा सिरसा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारात सपना सहभागी झाली. ती घडामोड दिल्लीपर्यंत पोहचली. त्यामुळे दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी तातडीने सपनाशी संपर्क साधून तिला कांडा यांच्या प्रचारात सहभागी होण्यापासून परावृत्त केले. तिवारी यांनी पुढाकार घेतल्यानेच हरियाणात लोकप्रिय असणाऱ्या सपना हिने जुलैत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

तिने कांडा यांचा प्रचार केल्याने दिल्ली भाजपच्या काही नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षविरोधी कारवायांबद्दल तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही काही जणांनी केली. नंतर सपनाने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे स्वत:च्या कृतीबद्दल खुलासा दिला. कांडा अपक्ष उमेदवार असल्याने त्यांचा प्रचार करता येऊ शकेल असा सल्ला आपल्या स्टाफने दिल्याचे तिने म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.