नगर -जून महिना सुरु झाला असला तरी अद्यापि शहरातील सीना नदी पात्रासह शहरातील ओढे-नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. या प्रश्नी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन शहरातील सीना नदी पात्रासह ओढे-नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिले आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, गिरीश जाधव, नगरसेवक निलेश भाकरे, दत्ता जाधव, मदन आढाव, काका शेळके, मनिष गुगळे, विशाल वाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावर्षी मान्सून लवकरच सक्रीय झाले असून, त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने सीना पात्राची अद्यापि साफ-सफाई पूर्ण केलेली नाही. काही दिवसांपूर्वी सुरु झालेले सीना पात्राच्या सफाईचे काम बंद पडले आहे. करोनाच्या नावाखाली नागरिकांच्या इतर प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील सीना पात्रासह प्रमुख ओढ्या-नाल्यांची सफाई झालेली नाही. शहरात पाऊसाचे आगमन झाले असून, मोठा पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मागील वर्षी सीना पात्रालगत असलेल्या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. सीना पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचून झाडे-झुडपे वाढली आहे. सीना पात्राची सफाई न केल्यास पाऊसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होऊन परिणामी पूरस्थिती उद्भवेल. त्यामुळे नालेगाव, काटवन खंडोबा रोड, वारुळाचा मारुती, नगर-कल्याण रोड येथील घरांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. शहरात पुरस्थिती निर्माण झाल्यास याला मनपा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे जिल्हा उपप्रमुख लहामगे यांनी म्हंटले आहे.