फलटण – फलटण शहर व परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फलटण नगरपरिषदेने नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेवून 15 अबेटिंग, 10 फॉगिंग पथकांमार्फत सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन ही मोहिम अधिक जोरदारपणे सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
फलटण शहरातील प्रत्येक घरामध्ये असलेली पाणी साठविण्याची भांडी, पाण्याचे हौद, अडगळीच्या ठिकाणी असलेले टायर व इतर टाकावू वस्तूंची पाहणी करुन जंतूनाशक फवारणी व अन्य उपाययोजना करणे (अबेटींग) आणि कंटेनर सर्वेसाठी 15 पथके कार्यरत आहेत.
त्याचबरोबर 10 पथकांमार्फत शहरात फॉगिंग करण्यात येत असल्याचे तसेच याकामी पुरेसे डिझेल, फॉगिंगसाठी स्प्रे, औषध (अबेट) उपलब्ध करुन देण्यात आल्याचे या बैठकीत आढाव्या दरम्यान स्पष्ट झाले. वरीलप्रमाणे विशेष पथकाद्वारे कार्यवाही सुरु असतानाच शहरवासियांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्याद्वारे पाण्याचे हौद, भांडी, वेळच्यावेळी धुणे व घासून पुसून कोरडी करणे, या भांड्यामध्ये साठविलेले पाणी झाकुन ठेवावे म्हणजे त्यामध्ये डेंग्यूच्या आळ्यांची उत्पत्ती होणार नाही याची माहिती शहरवासियांना देण्यात येत आहे.
कुटुंबामध्ये कोणीही आजारी असल्यास त्यांना तातडीने शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात दाखल करुन आवश्यक वैद्यकिय उपचार घ्यावेत अशा दाखल रुग्णांची माहिती तातडीने नगर परिषदेस द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरामध्ये विविध ठिकाणी सुरु असलेली नवीन बांधकामे व जुन्यांच्या दुरुस्तीकामी तेथे असलेला राडा, रोडा उचलून दूर टाकावा तसेच तेथील पाणी साठवण टाक्या वेळच्यावेळी स्वच्छ कराव्यात, सदरच्या टाक्या उघड्या ठेवू नयेत.
विशेषत: ऍबेटींगसाठी येणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, प्रामुख्याने पाण्याची भांडी दररोज रिकामी करुन कोरडी करावीत असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे यांच्यासह आरोग्य समिती सभापती अजय माळवे, ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगरपरिषद व सुविधा केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.