‘करोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आवाहन
पुणे – “करोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी. यांसह कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर होळी साजरी न करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाने केले आहे.
बोर्डाची सर्वसाधारण सभा ब्रिगेडिअर कुलजितसिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, उपाध्यक्ष विवेक यादव यांसह वैद्यकीय अधिकारी, नगरसेवक आणि बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी “करोना’च्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. यासह आवश्यक असणाऱ्या उपाययोजना आणि आवश्यक असणाऱ्या खबरदारीबाबत चर्चा झाली.
बोर्डाच्या हद्दीमध्ये संशयित आढळल्यास त्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यासाठी पटेल रुणालयात सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पुढील तपासणीसाठी संबंधितांना नायडू रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार आहे. यासह संशयित रुग्ण आणि रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना पुरेसे मास्क बोर्डाकडे उपलब्ध आहेत. बोर्डाच्या 5 शाळांमध्ये जागृती करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या रोगाबाबत तत्काळ बैठक घेण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.