‘स्वच्छ’साठी अर्धा टक्‍का नागरिकांचाच अभिप्राय

शहरवासीय अनुत्सुक : दहा दिवसांत चार हजार लोकांचा सहभाग

पिंपरी – सोशल मीडियावर अग्रेसर असलेले शहरवासी स्वच्छ सर्वेक्षणाचा अभिप्रायाच्याबाबतीत अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर अभियानात अव्वल ठरण्यासाठी इतर शहरातील नागरिक भरभरून अभिप्राय देत आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक अभिप्राय देण्यामध्ये मागे आहे. शहरात दहा दिवसांमध्ये अवघ्या 4 हजार 100 नागरिकांनी संकेतस्थळावरून अभिप्राय दिला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही टक्केवारी अवघी 0. 51 टक्के इतकी आहे. नागरिकांच्या या उदासीनतेचा परिणाम पिंपरी चिंचवड शहराच्या रॅंकिंगवर होण्याची शक्‍यता आहे.

केंद्र सरकारमार्फत दरवर्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व शहरांचे सर्वेक्षण केले जाते. गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड शहराचा 52 वा क्रमांक आला होता. शहराचे रेटिंग घसरण्यामागे अन्य कारणांसोबतच नागरिकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायचे अत्यल्प प्रमाण हे देखील प्रमुख कारण आहे. या वर्षी ऍप, संकेतस्थळ अशा माध्यमातून 31 जानेवारीपर्यंत अभिप्राय द्यायचे आहेत.

17 जानेवारीपर्यंत शहरातील 4 हजार 100 नागरिकांनी अभिप्राय दिला आहे. शहरातील लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण अत्यल्प आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखांच्या घरात आहे. त्यानुसार, हे प्रमाण अवघे 0. 51 टक्के आहे. स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराच्या प्रतिस्पर्धी असलेल्या, परंतु तुलनेने फार कमी लोकसंख्या असलेल्या शहरांनी स्वच्छ सर्वेक्षणसाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे.

पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी संकेतस्थळावरून अभिप्राय देणे आवश्‍यक आहे. मी प्रभातच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हायचे आहे. तसेच आपल्या शहराला स्वच्छ शहरामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त अभिप्राय द्यायचे आहेत.
– डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकिय अधिकारी, पिं.चिं. महापालिका.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.