लाइफलाइन ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल

करोना महामारीचा परिणाम : पीएमपीला आर्थिक फटका

चऱ्होली – पिंपरी-चिंचवड शहराची लाइफलाइन व सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी शहर वाहतूक सेवा म्हणजेच पीएमपीएल पुन्हा लॉकडाऊनच्या कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असून, कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

करोना रुग्णांची वाढती संख्या व करोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने पीएमपीएल वाहतूक सेवा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने एरव्ही प्रवाशांच्या गर्दीने फुललेले बस टर्मिनल प्रवाशांअभावी ओस पडलेले दिसत आहे. भोसरी येथील पीएमपी बस आगार तसेच मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या पीएमपीमुळे गाड्यांची गर्दी बघायला मिळत आहे.

खासगी वाहनांकडून जास्तीचे भाडे
शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रवाशांना सेवा देणारी पीएमपी वाहतूक सेवा बंद झाली आहे. तोच खासगी रिक्षावाल्यांनी भाडेवाढ केली असल्याचे समोर आले आहे. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी अटल योजना, महिलांसाठी राखीव बस असे विविध उपक्रम राबवून वित्तीय तूट भरून काढण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाची धडपड सुरू होती. मात्र मागच्या वर्षी आलेल्या करोनाच्या संकटामुळे शहरातील अनेक मार्गावरील बस बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे परिस्थिती न सुधारता त्यात आणखी भर पडली. कालांतराने परिस्थिती निवळत असताना परत लॉकडाऊन लागल्याने प्रशासनाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

मेन्टेनन्सचा खर्च वाढणार
शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या बस लॉकडाऊन झाल्यामुळे कित्येक दिवस एकाच ठिकाणी उभ्या आहेत. यामधील निम्म्या बस तर वर्षभरात रस्त्यावरून धावल्याच नाहीत. प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी संस्थेच्या बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. या सर्व बस मेन्टेनन्सचा खर्च प्रशासन करते. मात्र, आता या खर्चात दुपटीने वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. बस बंद असल्याने बॅटरी खराब होणे, टायर खराब होणे, रोज स्वच्छता होत नसल्याने धूळ व उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे जोपर्यंत पुन्हा पीएमपी पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत तोपर्यंत त्यांची निगा पीएमीपी प्रशासनाला राखावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.