पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तुकाराम महाराज बीजच्या निमित्ताने देहूगाव येथे येणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) दि. २६ ते २८ मार्च दरम्यान १२५ विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वेगवेगळ्या सात डेपोमधून देहूगावसाठी बस सोडल्या जाणार आहेत.
पीएमपीकडून देहूगावसाठी दररोज २५ बस सोडण्यात येतात. तर तुकाराम बीजनिमित्त विशेष १२५ बस सोडण्याच निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी देहूगाव येथे दोन बस स्थानक उभे करण्यात आले आहे. झेंडे मळ्याजवळील मिलिटरीच्या मोकळ्या जागेत पीएमपीकडून तात्पुरते बस स्थानक उभारण्यात येणार आहे.
तर, देहूगाव व आळंदी दर्शना करिता जाण्यासाठी देहू-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगदगुरू संत तुकाराम महाराज क्रिडांगणजवळील मैदानातून काही बस सोडण्यात येणार आहेत. जादा बसची व्यवस्था केलेल्या स्थानक व मार्ग स्वारगेट ते देहूगाव, मनपा भवन ते देहूगाव, मनपा भवन ते आळंदी, देहूगांव ते आळंदी, स्वारगेट ते आळंदी, पुणे स्टेशन ते देहूगांव, निगडी ते देहूगाव, हडपसर ते आळंदी असे असणार आहे. या बसला नियमित तिकीट दर असणार आहे. तरी सर्व भाविकांनी पीएमपीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
देहूगाव व आळंदीसाठी नियमित बस- २५
तुकाराम बीज निमित्ताने विशेष बस – १२५
देहूगाव व आळंदीसाठी बस सोडण्यात येणारी स्थानके – आठ