मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर जामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मलबार हिल पोलीस ठाण्याला दोन पोलीस अधिकाऱ्यांचे साह्य देण्यासाठी मदत मागितली आहे. परमवीर सिंह यांचे शासकीय निवासस्थान या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते.
मलबार हिल पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षकांना याबाबतचे पत्र सीआयडीच्या अधीक्षकांनी पाठवले आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमवीर सिंह हे सध्या चंदिगढ येथे असल्याची माहिती मिळत असून, ते मुंबईत न सापडल्यास त्यांना शोधण्यासाठी स्वतंत्र पथक पाठवण्यात येईल.
न्या. चंदिवाल आयोगाने सुनावणीसाठी अनुपस्थित राहात असल्याने परमवीर सिंह यांच्यावर दि. सात सप्टेंबर रोजी जामीनपात्र वॉरंट बजावले होते. जामीनपात्र वॉरंटमध्ये पोलीस ज्याला वॉरंट बजावते, त्याला अटक करू शकतात. मात्र, त्याने पुरेशा रकमेची वॉरंटमध्ये नोंद असलेल्या दिवशी आणि वेळी न्यायालयात उपस्थित राहण्याची हमी दिल्यास त्याला अटक करण्याची गरज पोलिसांना भासत नाही.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला दिले असल्याचा आरोप परमवीर सिंह यांनी केला होता. त्या आरोपात तथ्य आहे का? हे तपासण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. आयोगासमोर गैरहजर राहिल्याबद्दल आयोगाने परमवीर यांना तीनदा दंड ठोठावला आहे.
तिसऱ्या अनुपस्थितीनंतर, परमवीर सिंह यांना 25,000 रुपये दंड करण्यात आला, जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोविड 19 च्या निधीमध्ये जमा करण्यास सांगितले गेले. चौथ्यांदा अनुपस्थितीनंतर 50,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.
याआधी परमवीर सिंह यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. आयोगाने आता परमवीर सिंहाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.