पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिस गर्भवती होण्यास कारणीभूत ठरणाऱ्यास 15 वर्षे सक्तमजुरी व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी सुनावली. ऋषीराज बाबासाहेब शेळके (वय 22, रा. भांडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे.
दंडाची रक्कम 35 हजार रुपये आणि 1 लाख रुपये नुकसानभरपाई पीडितेला देण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात डीएनए चाचणीचा पुरावा महत्त्वाचा ठरला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. अरूंधती ब्रम्हे यांनी न्यायालयीन सुनावणीत पीडिता अज्ञान असल्याचे, तिचा गर्भपात व रासयनिक प्रयोगशाळा तपासणीचा डीएनए अहवाल यावरुन आरोपीच गर्भाचा जनुकीय पिता असल्याचे युक्तिवादात सांगितले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडिता व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
याप्रकरणी 17 वर्षीय पीडितेने येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपी व पीडित मुलीची येरवडा येथील एका महाविद्यालयात ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाईल क्रमांक तिला दिला. दोघे एकमेकांशी फोनवर बोलू लागले. एकदिवस आरोपीने मुलीस माझे तुझ्यावर प्रेम असून तु सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार असे वचन दिले. त्यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये त्याने मुलीस एका लॉजवर नेऊन लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिला पुन्हा महाविद्यालयात सोडले. त्यानंतर थोडयाच दिवसात मुलीस दिवस गेल्याचे कुटुंबियांना समजले व तिला खासगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला.
मात्र, गर्भपाताची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला त्यात तिने आरोपीमुळे दिवस गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन गर्भाचा डीएनए तपासणीस पाठवून खातरजमा केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांनी केला.