नवी दिल्ली : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कॅनडामध्ये चित्ररथ काढण्यात आला होता. दरम्यान, हे प्रकरण आता आंतराष्ट्रीय स्तरावर चांगलेच पेटले आहे. भारताकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असताना कॅनडामध्ये या चित्ररथाला समर्थन देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी कॅनडाच्या ब्रॅम्प्टन सिटीच्या महापौरांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.
ऑपरेशन ब्लू स्टारच्या 39 व्या वर्धापन दिनापूर्वी 4 जून रोजी झालेल्या परेड दरम्यान हा वादग्रस्त चित्ररथ काढण्यात आला होता. खलिस्तान समर्थकांच्या या चित्ररथामध्ये दोन शीख बंदूकधारी माजी पंतप्रधानांवर गोळीबार करताना दिसत होते. यासोबत पोस्टर्स लावण्यात आले होते, ज्यामध्ये हा बदला आहे असे लिहिले होते. इतर फलकांवर 1984 च्या शीख विरोधी दंगलीचा संदर्भ देणारे बॅनर होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
As an Indian, I’m appalled by the 5km-long #parade which took place in the city of Brampton, Canada, depicting the assassination of #IndiraGandhi.
It’s not about taking sides, it’s about respect for a nation’s history & the pain caused by its Prime Minister’s assassination.… pic.twitter.com/zLRbTYhRAE
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) June 7, 2023
भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी गुरुवारी याप्रकारणी कठोर शब्दात कॅनडाला सुनावले होते, हे परस्पर संबंध आणि कॅनडासाठी चांगले नसल्याचे जयशंकर म्हणाले होते. या घटनेनंतर लगेचच भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांनी ट्विट करून या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. द्वेष किंवा हिंसाचाराला कॅनडामध्ये स्थान नाही, असेही ते म्हणाले होते.
तर दुसरीकडे या प्रकरणावर कॅनडाच्या ब्रॅम्प्टन सिटीचे मेअर पॅट्रिक ब्राऊन यांनी, कॅनेडाच्या कायद्यानुसार टोरंटो एरियामधील परेड दरम्यानचे ते दृश्य कायद्यानुसार द्वेषासंबंधीत गुन्हा मानले जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत किंवा तो सिटी ऑफ ब्रॅम्प्टनचा कार्यक्रमही नव्हता. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाचा कायदा कॅनेडियनांना विचार, विश्वास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देतो. याशी संबंधित कायद्यात बदल करण्याचा कोणताही निर्णय फेडरल स्तरावर घेतला जातो. पोलिस कायद्यांची अमंलबजावणी करता, बनवत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.