मुंबई – सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला. नांदेड येथे ते बोलत होते. शहांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. शिवसेना फोडूनही शहांनी ठाकरेंचा एवढा धसका घेतलाय असा टोला यावेळी राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी शहांच्या व्हिडीओलाच रिट्विट करत उत्तर दिले आहे. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”गृह मंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे.मला प्रश्न पडला आहे.हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन..अमित भाई यांच्या भाषणातील वीस मिनिटात सात मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्रीचा धसका कायम.”
राऊत पुढे म्हणतात.”शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले.तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे.ये डर अच्छा है.जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने चिंतन करायला हवे. पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय..”
गृह मंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे.मला प्रश्न पडला आहे.हे भाजपा चे महा संपर्क अभियान होते की.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन..अमित भाई यांच्या भाषणातील२० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही… https://t.co/zYCTJllLDV
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 11, 2023
काय म्हणाले होते अमित शहा
ज्या हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत निवडणूक लढवली ते हिंदुत्व आता कुठं आहे ? ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेत. तीन तलाक, समान नागरी कायदा, राम मंदिर, मुस्लीम आरक्षण, वीर सावरकरांचा सन्मान करायचा की नाही याबाबत ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अमित शहांनी केली.
भाजपा तर्फे देशभरात ‘मोदी@९’ हे अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने अमित शहांची महाराष्ट्रातील पहिली सभा शनिवारी नांदेड मध्ये पार पडली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.