गलवान खोऱ्यातून चीनचे सैन्य मागे हटले; भारतीय सैन्याची सावध भूमिका

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान नदी खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता चीनने गलवान खोऱ्यातील आपले सैन्य मागे घेतले आहे. मात्र यावर भारतीय सैन्याने सावध पवित्रा घेतला असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. दरम्यान, चीनच्या या कृतीनंतर दोन्ही देशातील तणाव निवळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १५ जूनच्या रात्री याच गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चांगलाच संघर्ष झाला होता. त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.


भारतीय आणि चिनी सैन्याने बफर झोन तयार केल्याचे वृत्त आहे. सैन्य मागे घेण्याच्या मुद्दावर नेमकी काय सहमती झाली आहे , ते अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चीनने आपले तंबू, गाड्या आणि सैनिकांना मागे घेण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार हि प्रक्रिया सुरु झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या एका महिन्यापासून दोन्ही देशामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.