नवी दिल्ली : भारताचे शेजारी चीन आणि पाकिस्तान यांना धडकी भरणार आहे. कारण भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढवण्यासाठी लवकरच 26 सागरी लढाऊ विमाने नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. भारताने फ्रान्सकडून 26 राफेल आणि 3 फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने या प्रस्तावाला मंजुरी दिली. नौदलाच्या राफेलमुळे भारतीय नौदलाच्या लष्करी पराक्रमाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या युद्धसरावानंतर राफेल खरेदी प्रस्तावाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ही सागरी लढाऊ विमाने भारतीय नौदलाचे ऑपरेशन्स आणि गरजांसाठी पूर्णपणे अनुकूल असल्याचेही डेमोच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले आहे.
भारतीय नौदलाची ही नवी 26 सागरी लढाऊ विमाने आता आधीपासूनच नौदलात असलेल्या 36 राफेलच्या ताफ्यात सामील होणार आहेत. भारतीय वायुसेनेसाठी फ्रान्सकडून यापूर्वीच 36 राफेल खरेदी करण्यात आली आहेत.
राफेलमुळे आता भारताला वायूसेनेसोबतच नौदलाचीही ताकद आणखी वाढणार आहे. तसेच, राफेलचे दोन्ही एडिशन (हवाई आणि नौदल) आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर फ्रान्सच्या धर्तीवर लष्करी पर्याय स्वीकारणारा भारत हा पहिला देश बनेल.