पंधरवड्यात 300 रुपयांनी भाववाढ
80-100 रु. किलो किरकोळ बाजारातील चिक्कूचे भाव
पुणे – अवकाळी पावसामुळे चिक्कूच्या फळाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागील पंधरवड्यात चिक्कूची आवक लक्षणीय घटली आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात नेहमीच्या तुलनेत केवळ 30 ते 40 टक्के आवक होत आहे. मंगळवारी मार्केटयार्डात उच्च प्रतीच्या दहा किलो चिक्कूला 700 ते 800 रुपये भाव मिळाला. तर, दुय्यम दर्जाच्या मालाला प्रति दहा किलोस 300 ते 400 रुपये भाव मिळाला.
गेल्या पंधरा दिवसांत चिक्कूच्या भावात घाऊक बाजारात प्रतिदहा किलोमागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती चिक्कूचे व्यापारी पंढरीनाथ बिराजदार यांनी दिली. किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये किलो भावाने चिकूची विक्री होत आहे.
मंगळवारी बाजारात चिक्कूची 400 ते 500 डाग इतकी आवक झाली. एका डागामध्ये दहा किलो चिक्कू असतात. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर आणि मंचर परिसरात अवकाळी पावसामुळे झाडाचे चिक्कू गळून गेले आहेत. स्थानिक चिक्कूचा हंगाम सुरू होण्यास आणखी महिनाभर आहे. मात्र, तेथून होणारी आवक ही नगण्य असणार आहे. जिल्ह्यासह गुजरात येथून मार्केटयार्डात चिक्कूची आवक होते.
मात्र, गुजरातमधील चिक्कूूचा हंगाम दरवर्षी साधारणपणे 15 सप्टेंबरच्या सुमारास सुरू होतो. मात्र, यंदा तेथेही अतिवृष्टीमुळे हंगाम सुरू होण्यास उशीर झाला. अतिवृष्टी झाली नसती, तर दीड ते दोन हजार डागांची दररोज आवक झाली असती. मात्र, ती आता कमी होत असल्याचेही बिराजदार यांनी यावेळी बोलताना सांगितले.