पिंपरी, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यातील अ आणि ब वर्ग महापालिका गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचा राज्यात द्वितीय क्रमांक आला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, तसेच, स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी हे अभियान राबविण्यात आले.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियान राबविण्यात आले. त्यासाठी शाळांमध्ये भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा, अशी प्रमुख वैशिष्ट्ये स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली. हे अभियान शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतच राबविण्यात आले.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उद्यमनगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकवला आहे. या निमित्त आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांचे सहकार्य लाभल्याची भावना मुख्याध्यापक जयराम वायळ यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम वायळ, पर्यवेक्षक रंगनाथ गुंजाळ, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, दीपक फाटक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
६४ हजार ३१२ सरकारी शाळांचा समावेश
राज्यभरातील शाळांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा हे अभियान १ जानेवारी रोजी सुरु झाले. ४५ दिवसांत विद्यार्थी केंद्रीत व शाळा व्यवस्थापन अशा दोन प्रकारांमध्ये शाळांचे मूल्यमापन करण्यात आले. यात ६४ हजार ३१२ सरकारी शाळा आणि ३९ हजार खासगी शाळा सहभागी होत्या. एक कोटी ९९ लाख ६१ हजार ५८६ विद्यार्थी सहभागी झाले.
यामध्ये एक कोटी ४ लाख ६४ हजार ४२० विद्यार्थी, ९४ लाख ९७ हजार १६६ मुलींचा सहभाग होता. तालुका ते राज्यस्तरावर शाळांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून १ ते ५१ लाख रुपयांची बक्षिसे शाळांना देण्यात येणार आहेत. खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती.