मुंबई -आयपीएल स्पर्धेत रविवारी(दि.17) गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन याने खूपच सुमार दर्जाची गोलंदाजी केली. त्याच्या या अपयशामुळेच चेन्नईला हा सामना गमवावा लागला. या पराभवानंतर संघाचे चाहते संतापले असून त्यांनी जॉर्डनवर कडाडून टीका केली आहे.
जॉर्डनच्या गोलंदाजीवर गुजरातचा डेव्हीड मिलर व रशीद खान याने वादळी फलंदाजी केली. जॉर्डनच्या दर्जाहीन गोलंदाजीचा पुरेपूर लाभ या दोन्ही फलंदाजंनी घेतला व गुजरातचा विजय साकार केला. त्यानंतर मात्र, चाहत्यांनी जॉर्डनच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह लावले आहे. संघात महेंद्रसिंह धोनीसारखा माजी कर्णधार असतानाही रवींद्र जडेजाने त्याचा सल्ला का घेतला नाही, असा सवालही चाहत्यांनी केला आहे.
ख्रिस जॉर्डनचे ‘ती’ एक ओव्हर पडली महागात
रविवारी (17 एप्रिल) झालेल्या गुजरात टायटन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग्जच्या लढतीत 17 षटकांत गुजरातची धावसंख्या 5 बाद 122 अशी होती. त्यानंतर शेवटच्या तीन षटकांत संघाला 48 धावांची गरज होती. चेन्नई हा सामना जिंकेल असे वाटत होते, पण जडेजाने ख्रिस जॉर्डनला गोलंदाजीसाठी बोलावले.
गुजरातचा कर्णधार राशिद खान स्ट्राइकवर होता. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर एक षटकार ठोकून चेन्नईच्या संपूर्ण संघाला चकित केले. रशीदला कुठे गोलंदाजी करायची हे जॉर्डनला समजत नव्हते. या षटकात 25 धावा झाल्या. येथून सामना पूर्णपणे गुजरातच्या बाजूने झुकला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 169 धावा केल्या होत्या . प्रत्युत्तरात गुजरातने 19.5 षटकांतच लक्ष्याचा पाठलाग करत विजय साकार केला. आणि त्यामुळे चेन्नईला पुन्हा एकदा म्हणजेच सहा सामन्यांत पाचव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.