घास गिळण्यास त्रास? टॉन्सिल्स?

या ग्रंथींची उपयुक्तता काय आहे?

घसा दुखू लागला, खवखवू लागला, घास गिळण्यास त्रास होऊ लागला की, सुरू झाला टॉन्सिल्सच्या त्रास असं म्हटलं जातं. ब-याचदा टॉन्सिल्स काढून टाकले पाहिजेत, असेही सल्ले दिले जातात. प्रत्यक्षात शरीराची ‘संरक्षक भिंत’ म्हणून टॉन्सिल्स या ग्रंथींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाका-तोंडावाटे शरीरात प्रवेश करणा-या विषाणूंना अटकाव करण्याचं काम या ग्रंथी करतात.

मानवी शरीरात श्वसनमार्ग आणि अन्नमार्गाच्या द्वारापाशीच ग्रंथी असतात. या ग्रंथी म्हणजे टॉन्सिल्स. नाकामागे, घशात आणि जिभेच्या मुळाशी या ठिकाणी अशा ग्रंथींचं जाळं पसरलेलं असतं. नाकामागे आणि घशाच्या मधे असणा-या ग्रंथींस नाकामागचे टॉन्सिल्स म्हणतात. या ग्रंथींचं शास्त्रीय नाव आहे अ‍ॅडिनॉइड्स टॉन्सिल्स. घशातील ग्रंथीस म्हणजे पडजिभेच्या दोन्ही बाजूंना असणा-या ग्रंथीस पॅलाटाइन टॉन्सिल्स म्हणतात. या ग्रंथी फॉसिल टॉन्सिल्स म्हणूनही ओळखल्या जातात. कान आणि नाक यांच्यामध्ये टॉन्सिल्स असतात. त्यांना क्युबल टॉन्सिल्स म्हणतात. जिभेच्या मागच्या बाजूलाही लिंग्वल टॉन्सिल्स असतात. नाकामागील आणि जिभेतील टॉन्सिल्स आपल्याला दिसत नाहीत. मात्र घशातील टॉन्सिल्स तोंड उघडताक्षणी दिसतात. त्यामुळे सर्वसामान्यपणे टॉन्सिल्सचा उल्लेख घशातील टॉन्सिल्स असा होतो.

नाक आणि घशामागे या ग्रंथींचं जाळं असतं. श्वसनामार्फत घेतलेली हवा आणि मिळणा-या अन्नाचा घास हे टॉन्सिल्स या ग्रंथीच्या संपर्काशिवाय शरीरात जाऊच शकत नाही. यातील रोगजंतूंवर टॉन्सिल्सकडून प्रक्रिया केली जाते. रोगजंतूंपासून शरीर संरक्षण करण्याच्या प्रक्रियेत टॉन्सिल्समधून प्रतिद्रव्यं तयार होतात. ही प्रतिद्रव्यं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. लहान मुलांमध्ये वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. अशा वेळी टॉन्सिल्सचं कार्य महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच तर डॉक्टर टॉन्सिल्सचं ऑपरेशन करत नाहीत.

नाक-तोंडावाटे शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. हे विषाणू शरीरात आले की, ते हृदय, फुप्फुसं, जठर आणि मूत्रपिंड यांवर परिणाम करतात. या परिणामांपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी प्रतिद्रव्यं, प्रतिकारशक्ती तयार करण्याचं काम टॉन्सिल्समधल्या लिम्फॉइड उतींमुळे होतं. प्रतिकारशक्ती तयार करण्याच्या नादात टॉन्सिल्सचं आकारामान वाढतं तेव्हा टॉन्सिल्सना सूज येते. टॉन्सिल सुजण्याची इतरही कारणं आहेत. ते म्हणजे अतिथंड पाणी पिणं, कोल्डड्रिंक्समध्ये वापरलेले कृत्रिम रंग. यांचा परिणाम टॉन्सिल्समधल्या उतींवर होतो. कुठल्याही खाण्याचा पदार्थ रंध्रांमध्ये अडकल्यास तिथे पू होतो. त्याला क्रिप्टायटिस म्हणतात.

टॉन्सिल्सवर असलेल्या फटी आणि छिद्रांमध्ये अन्नकण अडकून राहतात. अडकलेले अन्नकण सडले तर त्या भागात जंतू घर करतात. त्यामुळे घसा दुखू लागतो. तापही येतो. टॉन्सिल्सच्या गाठी लालबुंद होतात. त्यात पूसुद्धा होतो. जबडय़ाच्या मागे मानेकडील टोकाखाली गाठी येतात. त्या दुखू लागतात. त्यालाच टॉन्सिलायटीज म्हणतात. यामुळे कधी कधी कानही दुखतो. टॉन्सिल्समध्ये काही विशिष्ट प्रकारच्या जंतूंचा प्रादुर्भाव झाला की, सांधेही दुखून येतात. अशा वेळी प्रतिजैविकं देऊन आजार बरा करावा लागतो.

वारंवार टॉन्सिल्सचा अटॅक आलं तर करावं लागतं. डॉक्टर प्रतिजैविकं देऊन आजार बरा करतात. रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर तोंड धुवून झाल्यावर कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. थंडगार पाणी पिण्यापेक्षा साधं नाहीतर माठातलं पाणी प्यावं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.