पुण्यावर आता रक्‍तसंकट! पुढील चार-पाच दिवस पुरेल इतकाच रक्‍तसाठा

लस घेण्याआधी रक्तदान करा, रक्‍तपेढ्यांचे आवाहन


पुढील काही दिवसांत परिस्थिती बिकट होण्याची भीती

पुणे – सध्या रक्ताचा मोठा तुडवडा आहे. शहरात चार-पाच दिवसच पुरेल एवढा रक्तसाठा आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट असून, जिल्ह्यामध्ये सुमारे तीन हजार रक्तपिशव्याच शिल्लक आहेत. एका रक्तपेढीतून सुमारे रोजच्या 50 ते 60 पिशव्या लागतात. लस घेण्याआधी रक्तदान करा. लस घेतल्यानंतर एक ते दीड महिना किंवा दुसरा डोस होईपर्यंत रक्तदान करता येणार नसल्याने सर्व रक्‍तपेढ्यांनी हे आवाहन केले आहे.

सध्या लसीकरण सुरू आहे. त्यामुळे रक्तदाते मिळत नाहीत. कारण लस घेतल्यानंतर लगेचच रक्तदान करता येत नाही. लसीचा चौथा टप्पा सध्या सुरू झाला आहे. तोही कोणतीही व्याधी नसलेल्यांचा आहे. यानंतर 30-35 तील वयोगटाचे लसीकरण सुरू होणार आहे. त्यांना लस दिल्यानंतर तेही किमान तीन महिने रक्तदान करू शकणार नाहीत, त्यामुळे पुढील तीन-चार महिन्यांत परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची भीती आहे.

आयटी कंपन्या, उद्योग या ठिकाणी बऱ्यापैकी रक्तदान शिबिरे होऊन रक्त संकलन पुरेशा प्रमाणात होते. मात्र, हेच सध्या बंद आहेत. “वर्क फ्रॉम होम’ असल्याने खास रक्तदानासाठी कोणी आवर्जुन बाहेर पडत नाही. शिवाय करोना संक्रमणाची भीती असल्याने अनेकजण रक्तदानासाठी पुढे येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

रक्ताचा तुटवडा असून, त्याची तजवीज करण्यासंबंधी आवाहन अन्न व औषध प्रशासन, राज्य रक्तसंक्रमण परिषद यांनीही केले आहे. जिल्ह्यातील सगळ्या रक्तपेढ्या, रक्तदान विषयात काम करणाऱ्या संस्था या सर्वांची सोमवारी (दि. 5) बैठक आयोजित केली असून, रक्तदान कसे वाढवता येईल, या संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

रक्तदानासंदर्भात जनजागृती सुरू आहे. रक्तदान शिबिरे घेणाऱ्यांशी संपर्क सुरू आहे, मेसेजेस पाठवत आहोत. माध्यमे, सोशल मीडियाद्वारे जागृती सुरू आहे. पुणे जिल्ह्यासाठी रोजचे एक लाखाचे लसीकरण असे उद्दिष्ट ठेवले, तर पाच दिवसांत पाच लाख जणांना लस दिली जाईल. हे पाच लाख लोक पुढचे तीन महिने रक्तदान करू शकणार नाहीत, त्यामुळे एप्रिल-मेमध्ये रक्‍ताचा तुटवडा येऊ शकतो. त्यामुळे गृहनिर्माण संस्था रक्तदान शिबिरे घेऊ शकतील का? त्यांच्या क्‍लब हाऊसमध्ये वगैरे सुरक्षेचे सर्व नियम पाळून ही शिबिरे सकाळ, संध्याकाळ आयोजित केली जाऊ शकतात का, यावरही विचार सुरू आहे.
– डॉ. अतुल कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढी


येत्या 15 दिवसांत सगळ्यांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरण करण्याआधी संबंधित व्यक्तीला रक्तदान केले आहे का, असे विचारले गेले पाहिजे. सगळ्यांनी लस घेतल्यानंतर रक्तदातेच उरणार नाहीत आणि भविष्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे.
– राम बांगड, “रक्ताचे नाते’ संस्था

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.