जाधववाडी – सेक्टर 16 राजे शिवाजीनगर येथील स्पाइन रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर मागील पंधरा दिवसांपासून ड्रेनेजलाइन तुंबल्याने मैलामिश्रित पाणी वाहत आहे. त्यामुळे राजे शिवाजीनगर, पंतनगर, कुदळवाडी, जाधववाडी परिसरात जाणाऱ्या वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी येथील ड्रेनेजलाइन त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागील पंधरा दिवसांपासून दूषित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. परंतु महापालिकेचा ड्रेनेजविभाग याकडे डोळेझाक करत असल्याने सर्वसामान्य व करदात्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्पाइन रोड हा रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या दूषित पाण्यातून चार चाकी वाहने जाताना दुचाकी चालकांच्या अंगावर पाणी येते. बऱ्याच वेळा वाहनचालकांमध्ये बाचाबाची होत आहे. परंतु प्रशासनाला याचे काहीच देणेघेणे नसल्याने मुख्य आणि रहदारीच्या मार्गावरील ड्रेनेजलाइन पंधरा दिवस होऊनही दुरुस्त केली जात नाही.
स्पाइन रोडला राजे शिवाजीनगर येथे वळायला दुभाजक असल्याने दिवसभर अनेक वाहने येथून ये-जा करतात. परिणामी वाहने खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आपटून पाणी पायी चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहे. राजेशिवाजीनगरमध्ये ही समस्या अनेक दिवसापासून असून आरोग्य विभागाचे कर्मचारी पाणी वाहताना दिसत असून याकडे कानाडोळा करीत आहेत. लवकरात लवकर ड्रेनेज दुरुस्ती करावी, अशी नागरिक मागणी करीत आहेत.
जवळपास पंधरा दिवसांपासून मैलमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर येथील ड्रेनेजलाइनची दुरुस्ती करावी.
– हेमंत चव्हाण, मा. अध्यक्ष लोकमान्य प्रतिष्ठान, राजे शिवाजीनगर.