मंचर -करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करीत असल्यामुळे आपल्या कुटुंबास त्याचा त्रास होऊ नये म्हणून कुटुंबाला गावी पाठवत चास (ठाकरवाडी, ता. आंबेगाव) ची कन्या गेल्या तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये आयसीयू वार्डमध्ये स्टाफ नर्स पदावर कर्यरत असून करोनारुग्णांची सेवा करीत त्यांना धीर देत आहे. गावची कन्या करोनायोद्धा असल्याचे ग्रामस्थ मोठ्या अभिमानाने सांगतात.
चास (ठाकरवाडी) गावाचे लोकनियुक्त सरपंच बबनराव मारुती बारवे व महाळुंगे (पडवळ) गावची कन्या सुलभा/नीलम बबनराव बारवे यांची कन्या दीक्षा बबनराव बारवे ही सामाजिक बांधीलकी व गावाकडील नागरिकांना मदत करण्याची भावना लक्षात घेऊन करोना रुग्णांची पहिल्या दिवसापासून सेवा करीत आहे. विशेष म्हणजे तिला अजून सेवेत कायम स्वरूपात घेतले नसतानाही रुग्णांची सेवा करण्यासाठी हे शिक्षण घेतले असून, निःस्वार्थ भावनेने आपण काम करीत असल्याचे तिने सांगितले.
जर कुटुंबीयांसमवेत राहिल्यास आपल्यामुळे त्यांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ही ओळखून ती गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या इतर सहकाऱ्यांसह हॉटेलमध्ये अलिप्त राहून कर्तव्य बजावत आहे. तिच्या या कार्याचा सर्व गावकऱ्यांना आणि नातेवाइकांना अभिमान वाटतो आहे, अशी भावना ग्रामस्थांच्या वतीने आयुर्वेदाचार्य डॉ. दत्ता चासकर यांनी व्यक्त केली.