6 मी.चे सर्वच रस्ते 9 मी. रुंद होणार

हरकती, सूचना मागवण्याला स्थायी समितीची मान्यता

पुणे – शहरातील विकासाला चालना देण्यासाठी 6 मी. रुंद रस्ते 9 मी. करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. प्रशासनाने ठेवलेल्या 323 रस्त्यांऐवजी सर्वच 6 मी. रस्त्यांची रुंदी 9 मी. करण्याची उपसूचना देऊन बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला.

चुकीच्या पद्धतीने मांडलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यामागे बांधकाम व्यावसायिकांचे हीत पाहाण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

शहरातील 6 मी रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या वास्तूंचा विकास करताना अशा वास्तूंना टीडीआर वापरता येत नव्हता. या दोन्ही विषयांबरोबरच शहरातील पुनर्विकासाला चालना देण्यासाठी 6 मी. रुंदीचे 323 रस्ते 9 मी. रुंद करण्यासाठी हरकती आणि सूचना मागवण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला होता.

दरम्यान, ठराविकच रस्त्यांचा प्रस्ताव हा ठराविक बांधकाम व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेवून ठेवण्यात आला. त्याऐवजी सर्वच रस्ते 9 मी. रुंद करावेत किंवा पूर्वीप्रमाणे 6 मी रस्त्याच्या कडेला असलेल्या मिळकतींना टीडीआर आणि प्रीमियम एफएसआय वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने आयुक्‍त आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. दोनच दिवसांपूर्वी संपूर्ण शहरातील 6 मी. रस्त्यांची रुंदी वाढवा. ठराविकच रस्त्यांची रुंदी वाढवल्यास सरकार म्हणून हस्तक्षेप करू, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.