विकासाच्या नावाखाली भाजपची “दुकानदारी’

रस्ता रुंदीकरण निर्णय : विरोधक आक्रमक

पुणे – शहरातील 6 मीटर रस्ते 9 मीटर रुंद करण्याच्या नावाखाली भाजपकडून विकासाच्या नावाखाली “दुकानदारी’ चालविली असल्याची टीका विरोधीपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यावेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, विकासाच्या नावाखाली आणलेल्या या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या. सुरुवातीला त्यात काही ठराविक रस्तेच घेतले. नंतर आम्ही विरोध करताच सगळे रस्ते घेण्यात आले. याशिवाय, विषयपत्राचे शीर्षक 6 मीटरचे रस्ते रुंद करण्याचे अनेक रस्ते 3 ते साडेचार मीटरचे आहेत. त्यामुळे विषयपत्र दुरुस्त करून तसेच संपूर्ण रस्ता रुंद झाल्याशिवाय टीडीआर वापरता येणार नाही, अशी अट घालण्याची मागणी आम्ही केली होती.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेतला जात आहे. तर अशाप्रकारे प्रस्ताव आणणे ही भाजपची मोडस ऑपरेंडी असल्याची टीका आमदार चेतन तुपे यांनी केली. या पूर्वीही काही ठराविक बांधकाम व्यावसायिकांसाठी विधानसभा निवडणुकी आधी काही रस्त्यांचे रुंदीकरण कमी करण्याचा घाट भाजपने घातला होता, असे ते म्हणाले. दरम्यान, प्रस्तावामागे कोट्यवधींचा भ्रष्टाचार असून सर्व बाबी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देत हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे शिवसेना गटनेते सुतार यांनी स्पष्ट केले.

“भाजप शहराध्यक्ष बालबुद्धीचे’

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी “दादा, दादागिरी करू नका.. पुण्यात हे चालणार नाही’ अशी टीका केली होती. त्याचा खरपूस समाचार चेतन तुपे यांनी घेतला. भाजपचे शहराध्यक्ष हे भ्रष्टबुद्धी आणि बालबुद्धीचे असल्याची टीका तुपे यांनी केली. शहराचा विकास आराखडा राज्य शासनाने महापालिकेकडून काढून घेतला, तो मंजूर करताना बिल्डरांची शेकडो आरक्षणे भाजप सरकारने वगळली. तसेच शहरात मेट्रो, समान पाणी योजना, भामा-आसखेड योजना, उड्डाणपूल आम्ही सुरू केले तर ते भाजपच्या काळात पूर्ण झाले, असे असताना या कामांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोप तुपे यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.