पुणे – देशातील संचारबदीचा कालावधी वाढवल्याने सनदी लेखापाल आणि कंपनी सचिव या अभ्यासक्रमांच्या जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार असून, त्याबाबतची माहिती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (आयसीएसआय) परिपत्रकाद्वारे दिली आहे.
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या परीक्षा 29 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान, तर कंपनी सचिव अभ्यासक्रमाची परीक्षा 6 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात मार्चमध्ये संचारबंदी लागू झाल्यानंतर मेमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून 19 जून ते 4 जुलैदरम्यान परीक्षा होणार असल्याचे आयसीएआयकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता केंद्र सरकारने संचारबंदीचा कालावधी दोन आठवडयांनी वाढवल्यानंतर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता 29 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार असल्याचे “आयसीएआय’चे अतिरिक्त सचिव एस. के . गर्ग यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. परीक्षेची सविस्तर माहिती आयसीएसआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान, कंपनी सचिव अभ्यासक्रमाची 1 ते 10 जूनदरम्यान परीक्षा होणार होती. आता ही परीक्षा 6 जुलैपासून सुरू होणार असल्याचे “आयसीएसआय’ने स्पष्ट केले आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संस्थेच्या वेबसाइटवर लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे संस्थेचे सचिव अशोक कुमार दीक्षित यांनी म्हटले आहे.