डेहराडून: उत्तराखंडमधील गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ येथील चार धाम यात्रा मंदिरे येत्या 26 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. हिमवर्षावामुळे ही मंदिरे सहा महिने बंद असतात. उन्हाळ्याच्या सुरूवातीला ती धार्मिक विधीने व हजारो भाविकांच्या गर्दीत उघडली जातात. या मंदिराचे दरवाजे उघडणे हा एक मोठा धार्मिक सोहोळा असतो. यंदा ही मंदिरे ठरलेल्या मुहूर्तावर उघडणार असली तरी तेथे करोनामुळे भाविकांना अनुमती दिली जाणार नाही. त्यामुळे भविकांच्या अभावी ही मंदिरे सुरू होणार आहेत.
गंगोत्री आणि यमुनोत्रीची मंदिरे 26 एप्रिलला सुरू होतील आणि केदारनाथ मंदिर 29 एप्रिलला सुरू होणार आहे. बद्रिनाथ मंदिर मात्र यंदा 15 मे रोजी उघडले जाणार आहे. उत्तराखंडचे पर्यटन व सांस्कृतीक मंत्री सत्यपाल महाराज यांनी सांगितले की आम्ही या मंदिरांच्या दरवाजे उघडण्याच्या कार्यक्रमासाठी संबंधित साधुंनाच अनुमती देणार आहोत पण भाविकांना मात्र यंदा परवानगी दिली जाण्याची शक्यता नाही. ही मंदिरे किती काळासाठी भाविकांना बंद असतील असे विचारता ते म्हणाले की त्या विषयी केंद्र सरकारकडून जी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होतील त्यानुसार आम्ही भाविकांना येथे अनुमती देऊ.
आमचे सध्याचे प्राधान्य प्राचीन परंपरेप्रमाणे मुहूर्तावर ही मंदिरे खुली करणे आहे ते आम्ही करीत आहोत. करोना प्रादुर्भावामुळे उत्तराखंडच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्याचा नेमका किती आर्थिक फटका राज्याला बसणार आहे त्याचा अभ्यास सुरू आहे असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.