पुणे – खराडी ते हडपसर मार्गावरील मुंढवा-केशवनगर चौकातील वाहतूक कोंडीतून या भागातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. हडपसर रेल्वे उड्डाणपूल ते मुख्य चौक आणि पुढे नदीवरील पूलापर्यंत महापालिकेकडून एका रात्रीत रस्ता ताब्यात घेऊन तयारही करण्यात आला आहे. 32 वर्षांपासून या चौकात होणाऱ्या कोंडीतून दिलासा मिळणार आहे. प्रत्यक्षात विकास आराखड्यात हा रस्ता 24 मीटर असला तरी, काही ठिकाणी 14 तर काही ठिकाणी 18 मीटर रूंद होता. यामुळे हडपसरकडून येणारी जड वाहने चौकात येताच कोंडी होत होती.
पालिकेने दोन महिन्यांपासून नियोजन करीत शुक्रवारी (दि.18) रात्री पोलीस बंदोबस्तात रस्त्याच्या दोन्ही बाजूला चौकापासून खराडी तसेच हडपसरकडे जाण्यासाठी तिसरी मार्गिका उपलब्ध करून दिली. दोन्ही बाजूस जवळपास 200 मीटर लांबीच्या रस्त्याचे दिड ते तीन मीटर पर्यंत रूंदीकरण करण्यात आले आहे. पथ विभाग, अतिक्रमण विभाग, स्थानिक पोलिसांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला.
काय होती समस्या…
हडपसरकडून खराडीकडे जाणारा हा मुख्य रस्ता सोलापूर आणि नगर महामार्गास जोडतो. हा 24 मीटर रूंदीचा प्रस्तावित होता. यासाठी 1992 मध्ये भूसंपादन करण्यात येऊन जागेचे अवॉर्डही झाले. परंतु, हा रस्ता काही भागात 14 तर काही भागात 18 मीटरच रूंद होता. मुंढवा पुलाच्या पुढे हा रस्ता 36 मीटर असल्याने या चौकात बॉटल नेक स्थिती झाल्याने तसेच मुख्य चौकात जाताना एस आकाराचे वळण असल्याने केवळ दिड लेनमुळे कोंडी होत होती. या रस्त्यावर काही भागात टपरी, राडारोडा, सिमाभिंत, शेड, स्वच्छतागृह, स्टॉलही ठेवलेले होते. काही ठिकाणी राडारोड्याचे ढीग असल्याने वाहनांची गती चौकात जाण्यापूर्वी संथ होऊन कोंडी होत होती.
अधिकाऱ्यांनी केला अभ्यास…
महापालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून या चौकातील कोंडीचा अभ्यास केला. जड वाहनांना अपुरा रस्ता तसेच प्रत्यक्षात प्रस्तावित रुंदीचा रस्ता नसल्याचे लक्षात आले. सर्व विभागानी एकत्र बैठक घेतली त्यानुसार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता संदीप रणवरे, मुंढवा-क्षेत्रीय कार्यालयातील बाळासाहेब ढवळे-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्यासह पालिकेच्या पथकाने हे रुंदीकरण मार्गी लावले.