नागपूर – २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याच्या निमित्ताने मशिदी, दर्गे आणि मदरशांमध्ये श्री राम, जय राम, जय जय राम या मंत्राक्षराचा ११ वेळा जप करण्याचे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केले आहे. त्यानुसार, मदरसे, दर्ग्यांसह चर्चमध्येही रामनामाचा जप व्हावा असा प्रयत्न मुस्लीम राष्ट्रीय मंच करणार आहे, अशी माहिती मंचाचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर यांनी गुरुवारी दिली.
भारतातील ९९ टक्के मुस्लिम आणि इतर गैर-हिंदूंचा भारताशी संबंध आहे. त्यांचे नाते भविष्यातही कायम राहिल, कारण आपले पूर्वज एकच होते. त्यांनी आपला धर्म बदलला, देश नाही ही मुस्लीम राष्ट्रीय मंचाची आधीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेला अनुसरूनच मंचाने आवाहन केल्याचे विराग पाचपोर यांनी सांगितले. दर्गा, मकतब, मदरसे आणि मशिदींमध्ये 11 वेळा ‘श्री राम जय राम जय जय राम’ ची पुनरावृत्ती झाली पाहिजे. इतर वेळी ते त्यांच्या उपासना पद्धतीचा अवलंब करू शकतात.
इस्लाम, ख्रिश्चन, शिख किंवा इतर कोणत्याही धर्माचे अनुसरण करणाऱ्या लोकांनी अयोध्येच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपापल्या धार्मिक ठिकाणी शांती, सद्भाव आणि बंधुता यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संरक्षक आणि मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी यापूर्वीच केले आहे, याकडेही विराग पाचपोर यांनी यावेळी लक्ष वेधले.
आपले पूर्वज एकच आहेत, आपले स्वरूप सारखे आहे, आपली ओळख आकांक्षा देखील सारखीच आहे. आपण सर्व या देशाचे आहोत, परकीयांशी आपला काही संबंध नाही अशी भूमिका इंद्रेश कुमार यांनी यापूर्वीही स्पष्टपणे घेतली आहे. त्यानुसार आवाहन करण्यात आल्याचे पाचपोर यांनी सांगितले. वाराणशी, लखनऊ, कानपूर, बिहार, उत्तराखंड या राज्यांतूत २५ ते ३० जानेवारी दरम्यान मुस्लिमांसह शीख, जैनांसह इतर पंथीयांना सोबत घेऊन अयोध्येपर्यत पायी यात्रा काढण्यात येणार आहे.
“है राम के वजुद पे हिंदुस्ताको नाज| एहले नजर समझते है उसको इमाम ए हिंद” असे कवी इक्बालने म्हटले आहे. आजपर्यत इक्बालचे मत कोणीही खोडून काढलेले नाही. वा त्या विरोधात फतवा जारी केलेला नाही. यास्तव आही सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे पाचपोर यांनी यावेळी बोलताना सांगितले.