नगर – मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवणे व ध्वनीक्षेप क्षमता तपासून कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना देण्यात आले. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सचिव संतोष साळवे, उपाध्यक्ष तुषार हिरवे, संदीप चौधरी, वाहतूक सेना अध्यक्ष अशोक दातरंगे, विभाग अध्यक्ष किरण रोकडे आदी उपस्थित होते.
या वेळी सचिन डफळ म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून मशिदीवरील अनाधिकृत भोंग्याबाबत प्रशासनास वेळोवेळी निवेदन, स्मरणपत्र देण्यात येत आहेत. परंतु त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होतांना दिसत नाही. आज पुन्हा निवेदन दिले आहे. आता संबंधितांवर कारवाई व्हावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यापुर्वीच मनसेने मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवून कारवाई करणे बाबत निवेदन दिले होते. त्यावेळेस आपण केलेल्या कारवाईमुळे काही काळापुरता भोंग्यांचा आवाज कमी झाला होता. परंतु आता पुन्हा मशिदीवर अनधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत. याबाबतच्या तक्रारी शहरातील नागरिकांकडून होत आहेत. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले आणि विद्यार्थी यांना भोंग्याच्या कर्कश आवाजामुळे होणार्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुठलाही ध्वनीक्षेप वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्या दिवसापूर्ती ध्वनीक्षेप लावण्याची परवानगी मिळेल. परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही आपल्या पोलीस प्रशासनाची असून शहरातील सर्व मशिदीवरील अनाधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.