वाघोली(प्रतिनिधी) – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या वाघोली पोलीस चौकीचा प्रभारी अधिकारी बदलण्याची मागणी भाजप नेते संदीप सातव यांनी केली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सातव यांनी मागणी केली असून या निवेदनात नमूद केले आहे की, वाघोली पोलीस चौकी येथील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे 19 आॅगस्ट 2022 रोजी वाघोली केसनंद रोड वरील हिल शायर सोसायटी मधील सांडपाणी तक्रारीच्या अनुषंगाने सोसायटी मधील नागरिकांनी पोलीस तक्रारी बाबत माहिती सातव यांना दिली होती.
सातव हे लोकप्रतिनिधी या नात्याने माहिती घ्यायला गेले असता सदर प्रकरणात सोसायटी व इतर यांच्याकडून सातव यांना ‘दोन लाख रुपये दया’ अशी मागणी संबंधित अधिकारी यांनी केली असल्याचा आरोप सातव यांनी निवेदनात केला आहे. पैसे दिल्यानंतर सदर अर्ज मी निकाली काढतो असे त्या प्रकरणात त्या अधिकाऱ्याने सातव यांना सांगितले.
“वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रार निवेदनानुसार या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला असून बेकायदेशीररित्या पैशाची मागणी करून त्या पैशासाठी संबधित अधिकाऱ्याकडून नागरिकांची करण्यात आलेली पिळवणूक उघड झाली असून वाघोली चौकी प्रभारी अधिकारी तातडीने बदलण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– संदीप सातव (संघटन सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा)
सांडपाणी प्रश्ना बाबत पोलीस यंत्रणेला अधिकार नसताना देखील गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवत त्या अधिकाऱ्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप सातव यांनी निवेदनात केला असून या प्रकरणाची चौकशी करून त्या अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्याची मागणी सातव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
“संदीप सातव यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात आली असून या प्रकरणातील संबंधित नागरिक, अधिकारी यांचे जबाब घेण्यात आले असून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
– गजानन पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे)
या प्रकरणी केसंनद ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या हद्दीत सांडपाणी टाकणाऱ्या व्यक्तीवर 500 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तर पुणे मनपाच्या वतीने देखील संबंधित सांडपाणी टाकणाऱ्या व्यक्तीवर 11 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.