जळगाव – चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारे सर्व मारेकरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या पायाला तीन ते चार गोळ्या लागल्याची माहिती आहे. या गोळीबारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. महेंद्र उर्फ बाळू मोरे असे भाजपच्या नेत्याचे माजी नगरसेवकाचे आहे. त्यांच्यावर चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र मोरे त्यांच्या कार्यालयात असताना सात ते आठ जण शिरले. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारात महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले. गोळीबाराची माहिती मिळाल्यावर चाळीसगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. महेंद्र मोरे यांच्या कार्यालयात शिरलेल्या सगळ्यांनी कापड टाकून तोंड झाकले होते. गोळीबार केल्यानंतर हे सगळे पुन्हा एकदा गाडीत बसून फरार झाले. दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्येच शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. गोळीबाराची ही घटना ताजी असतानाच आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.