Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच राज्यातील राजकारणातही सध्या वेगवेगळी समीकरणं जुळताना दिसून येतायेत. काल याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत येण्यावर चर्चा झाली असल्याचे समजते. ( Chandrashekhar Bawankule | Raj Thackeray )
दरम्यान, आज देखील वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. अश्यातच आता या भेटीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरंतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकललं. परंतु, आता देशाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरे आमच्याबरोबर येतील. पंतप्रधान मोदींचा विकसित भारत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे हातभार लावतील. राज ठाकरे यांनी तसा विचार केल्यास आम्ही त्यांचं आनंदाने स्वागत करू.
मनसे महायुतीत आली तर त्यांना किती जागा देणार या प्रश्नावर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी केलेल्या संवादावेळी उत्तर दिलं. बावनकुळे म्हणाले, महायुतीतले सर्वच घटक पक्ष मिळून आम्ही प्रत्येक मतदारसंघात 51 टक्के मतं मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तोच आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक बुथवर आम्ही काम करत आहोत.
प्रत्येक मतासाठी, प्रत्येक जागेसाठी आम्ही लढाई लढू. आमचे उमेदवार निवडून आणू. आम्हाला जिंकण्याचं राजकारण करावं लागेल. महायुतीत ज्यांना जी जागा मिळेल ती लढवून जिंकावी लागेल. आम्ही जागा आणि चिन्हांचा विचार करत नाही. आम्ही केवळ प्रत्येक जागा महायुती कशी जिंकेल यासाठी प्रयत्न करू. असं ते यावेळी म्हणाले.
मनसेला या जागा मिळण्याची चर्चा – ( Chandrashekhar Bawankule | Raj Thackeray )
मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. दक्षिण मुंबई येथे अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे तर, शिर्डीच्या जागेवर बाळा नांदगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे. लॅन्डस येथे झालेल्या बैठकीनंतर शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत बातचीत होणार असल्याचे समजते. ( Chandrashekhar Bawankule | Raj Thackeray )